Ganeshotsav 2024: गणपतीसारख्या देवतेला उंदरासारखे एवढे छोटे वाहन कसे? जाणून घ्या...
हिंदू देवतांमध्ये प्रत्येक देवतेचे स्वतःचे वाहन असते. विष्णूचे वाहन गरुड, देवी लक्ष्मीचे वाहन घुबड, माता सरस्वतीचे वाहन हंस, शिवाचे वाहन नंदी बैल, माता पार्वतीचे वाहन वाघ आहे. सर्व देवतांच्या वाहनाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. तसेच गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपती बाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, गणपतीने उंदराला आपले वाहन म्हणून का निवडले?
एकदा इंद्रसभेत गंभीर विषयावर चर्चा सुरू होती परंतू क्रौंच नावाच्या गंधर्वाचे मन अजून कुठेतरी रंगलेले होते. क्रौंच तेथे उपस्थित असलेल्या अप्सरांसोबत थट्टा करत होते. हे बघून इंद्र नाराज झाले आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला, की आता तू उंदीर होशील. शापाने क्रौंचाचे बलवान उंदरात परिवर्तन झाले. तो उंदीर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला.
या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात खूप धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली. आश्रमातील ग्रंथ-पोथ्या, कपडेसुद्धा त्याने कुरतुडून टाकले. त्याने आश्रमवासी आणि पराशरऋषींना भंडावून सोडले. शेवटी पराशरऋषींनी श्रीगजाननाची प्रार्थना केली, ‘ हे गजानन! आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव.’
मग गणपतीने तेथे प्रकट होऊन आपला पाश उंदरावर टाकला. पाताळात उंदीराचा पिच्छा करत पाशने त्याचा कंठ बांधला गेला आणि गणपतीसमोर प्रस्तुत झाला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करु लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीने त्याला वर मागण्यास सांगितले. पण उंदराचा उन्मत्त्पणा अजूनही गेला नव्हता. त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटले, ‘मला तुझ्याकडून कोणताही वर नको हवं असल्यास तूच माझ्याकडे वर माग.’ त्याचा हा उद्धामपणा पाहून गणपती हास्यस्मित करत लगेच म्हणाले, ‘जर तुझं वचन सत्य आहे तर आजपासून तू माझे वाहन हो.’ मूषकने तथास्तु म्हटले आणि गणपती लगेच उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदराच्या प्राणावर संकट ओढावले तेव्हा उंदराने प्रार्थना केली की मला तुझा भार सहन करणे योग्य करं. आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला.